Sunday, January 22, 2012

शाळा - एक नॉस्टेल्जिया | Shala Marathi Movie Review


शाळा - एक नॉस्टेल्जिया!


शाळा - एक नॉस्टेल्जिया | Shala Marathi Movie Review-blog.Maanbindu.com

सध्या सगळीकडे चर्चा आहे सुजय डहाके दिग्दर्शीत "शाळा" या चित्रपटाची! मिलींद बोकील लिखित शाळा या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत असून या चित्रपटाच्या निमीत्ताने प्रत्येक प्रेक्षक "शाळा" पहाताना आपल्या शालेय जीवनात जगलेल्या आयुष्याचा नॉस्टेल्जिया पुन्हा अनुभवतो!!

चित्रपट पहाताना तीन गोष्टींचे विशेष कौतुक करावेसे वाटते, त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कलाकारांची निवड आणि त्यांचा 'सहजाभिनय'! सारेगमप लिटल चॅंप्समध्ये स्पर्धक असलेल्या केतकी माटेगावकर हिला 'शिरोडकर'च्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पहाताना तिच्या साध्या, सुंदर आणि आणि निरागस दिसण्याने क्षणभर सगळ्यांचाच काळजाचा ठोका चुकतो आणि आपापल्या शालेय जीवनातली 'शिरोडकर' नकळत सगळ्यांच्याच डोळ्यासमोरून तरळून जाते!तिने आणि विशेषत: अंशुमन जोशी याने मुकुंद जोशीची भूमिका साकारताना केलेला वावर हा इतका सहज आहे की त्यांच्या नेहमीच्या शालेय जीवनाचं हे एखाद्या छुप्या कॅमेराने केलेलं शुटींग आहे की काय असा भास होतो. संपूर्ण चित्रपटात या दोघांच बेअरिंग अतिशय उत्तम जमलय आणि त्या दोघांचा पडद्यावरचा वावर हवाहवासा वाटतो! सिनेमात बरेच प्रसंगी अंशुमन जोशीने काहीही न बोलता केलेला केवळ चेह-यावर आणलेले भाव त्याच्या मनातलं सारं काही सांगून जातात. फावड्या, सु-या आणि इतर सगळ्याच पात्रांची निवड आणि त्यांचेही अभिनय लाजवाबच!


चित्रपटामध्ये कौतुक करण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटाचे लोकेशन्स! १९७० च्या दशकातलं गाव, गावामधली शाळा, आजूबाजूचा परिसर, मंदीर, शेत, डोह सारं काही मूळ कांदबरीत असलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळणारं आहे. त्या काळातल्या लोकांचे वेष ,ते वापरत असलेली त्या काळची जुनी घड्याळं, इतकचं काय तर बाजारात खरेदी विक्री करताना २ आणि ५ रुपयाच्या नोटा वापरण्यापर्यंत केलेलं डीटेलींग खरोखर वाखाणण्याजोगं आहे! आणिबाणीचा काळ दाखवताना त्यावेळेचे पोलीसांचे वेष, त्यावेळच्या लोकांची वागण्याबोलण्याची पद्धत हे ही खासच!

चित्रपटातील कौतुक करण्याची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वरील सगळ्या गोष्टी हाताळताना सुजय डहाकेमध्ये असलेलं दिग्दर्शन कौशल्य! इतक्या प्रसिद्ध कादंबरीवर चित्रपट बनवणं हे काम मुळातच खूप जोखमीच आणि अवघड आहे! दोन ते अडीच तासात अख्खी कादंबरी लोकांसमोर मांडण्यासाठी खूप अभ्यासाची आवश्यकता आहे. त्यातल्या वातावरणाची, पात्रांची निवड आणि त्यांचा अभिनय आणि एकंदरीतच डीटेलिंग पहाताना सुजय हा चित्रपट ख-या अर्थाने 'जगलाय' हे सतत जाणवत रहातं. चित्रपट कुठेही रटाळ, संथ वाटत नाही आणि चित्रपटातला प्रत्येक संवाद ,फ़्रेम अन फ़्रेम प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते. मात्र चित्रपट संपवताना थोडीशी घाई झाल्यासारखं वाटतं. चित्रपटाची लांबी थोडी वाढवून शेवट अधिक परिणामकारक करता आला असता असं वाटतं! संपूर्ण चित्रपटात एवढी एकच गोष्ट खटकते, बाकी चित्रपट अगदी नॉस्टेल्जिक आणि 'संग्राह्य' असून पदार्पणातच इतका सुंदर चित्रपट करून सुजयने दिग्दर्शनात 'Distinction' मिळवलय हे नक्की!

'शाळा' या चित्रपटाच्या निमित्ताने अजून एका प्रकारच्या बदलाचे वारे मराठी चित्रपटसृष्टीत वाहू लागले तर ते शाळा या चित्रपटाचं सर्वात मोठं यश ठरेल आणि ते म्हणजे उत्तमोत्तम साहित्याचर आधारीत चित्रपट निघण्याचे! मराठी भाषेत गेल्या अनेक दशकात दर्जेदार साहित्य निर्माण झालयं! त्या साहित्यावर व्यावसायिकरित्या यशस्वी चित्रपट जर निर्माण होऊ लागले तर मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा ख-या अर्थाने समृद्ध होईल. नटरंग या चित्रपटाने व्यावसायिक यश संपादन करत यातलं पहिलं पाऊल टाकलं आहे, शाळा हे त्यातलं दुसरं पाऊल ठरावं यासाठी मानबिंदू परिवारातर्फे अनेक शुभेच्छा!