नुकतीच भारतात इंटरनेट वापरणा-यांची संख्या १०० मिलियन (१० कोटी) वर पोहोचल्याची बातमी वाचनात आली आणि अर्थातच ही संख्या भविष्यात वाढतच जाणार आहे! सध्याच्या युगात इंटरनेट वापरणा-या जवळपास प्रत्येकाचे फेसबुकवर अकाउंट असतच; म्हणून कलाकारांना स्वत:ची कला लोकांपर्यंत पोहोचवण्याच फेसबुकसारखं दुसरं माध्यम नाही. पण हे माध्यम योग्यप्रकारे हाताळण्याचेही काही अलिखित नियम आहेत आणि ते पाळल्यासच फेसबुकचा जास्तीत जास्त फायदा कलाकारांना होईल. हेच नियम सगळ्या कलाकरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उहापोह!
"A wise man is not the one who knows what to say but rather the one who knows what NOT to say" या प्रसिद्ध उक्तीनुसार फ़ेसबुक कसं वापरावं यापेक्षा फेसबुक कसं वापरू नये हे आधी सांगणं आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं.
फ़ेसबुक कसं वापरू नये
१. स्पॅमिंग करू नये : आपली गाणी/व्हिडिय़ोज "हॅमर" केल्यास ती लोकांना आवडतील या समजापोटी बरेचदा कलाकार आपली गाणी/व्हिडीयोज यांची एकच लिकं साधारणत: दररोज आपल्या किंवा दुस-यांच्या वॉलवर किंवा सतत एका ग्रूपमध्ये पोस्ट करतात. प्रत्येक ग्रुपवर, वॉलवर एखाद दोनदा पोस्टस करण हे योग्य आहेच, पण रोज त्याच त्याच गोष्टी "हॅमर" करणं म्हणजे स्पॅमिंगच आहे! असं करणा-या कलाकारांचाच (त्या गाण्या/व्हिडीयोपेक्षा) लोकांना कालांतराने "विट" येऊ लागतो आणि त्या कलाकारानी केलेल्या नंतर केलेल्या कुठल्याही पोस्ट सगळे Ignore करू लागतात. तुम्हाला रोज सकाळी वर्तमानपत्रात त्याच बातम्या वाचायला मिळाल्यास कसं वाटेल याचा विचार करा. प्रमोट करा आणि स्पॅम नव्हे!
२. स्वत:च ग्रूप तयार करून सरसकट सगळ्यांना ऍड करणे : आपली कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा सर्वात सोप्पा मार्ग कलाकारांना वाटतो. पण असे ग्रूप तयार करताना ऍड केल्या जाणा-या व्यक्तीची पूर्वसंमती घेणं आवश्यक नसल्याने, बरेचदा व्यक्तीला इंटरेस्ट नसताना त्यात ऍड केलं जातं. त्यांनतर कलाकारांनी केलेल्या सततच्या पोस्ट्समुळे त्या व्यक्तीला सतत नोटीफिकेशन्सचे इमेल येतात आणि ती व्यक्ती वैतागून त्या कलाकाराबद्दल तिचे निगेटीव्ह मत तयार होते! हा एक अप्रत्यक्ष स्पॅमिंगचा प्रकार आहे! तसच News Feed तयार करताना फ़ेसबुकच्या अल्गोरिदममध्ये ग्रूप पोस्टसना कमी प्राधान्य आहे, म्हणूनच अशा ग्रूप्सची सदस्यसंख्या आपोआप फार वाढत नाही आणि तुम्ही त्याच लोकांपर्यंत तीच माहिती पोहोचवत रहाता!
३. फोटोत नसलेल्या व्यक्तींना टॅग करणे : आपल्याबद्दची महिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक सोपा उपाय बरेचजण वापरतात. या पर्यायाचा वापर एखादवेळेस फार महत्वाची बातमी पोहोचवण्यासाठी केल्यास ठीक आहे पण वारंवार या गोष्टी केल्यास लोकांना तुमचा वीट येऊ लागतो आणि तुमच्याबद्दल निगेटीव्ह मत तयार होते!
४. फेसबुकचा वापर "फक्त" स्वतच्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी करणे : फेसबुक हे माध्यम संवाद साधण्यासाठी केलं असून फक्त "ब्रॉडकास्टींग"साठी नाही हे लक्षात घ्या. कार्यक्रमाच्या माहितीबरोबरच इतर विषयांवर वरचेवर पोस्ट्स कराव्यात जेणेकरून तुमच्या प्रोफाईलला एक "पर्सनल टच" येईल!
आता पाहूया फ़ेसबुक कसे वापरावे
१. स्वत:चे (फॅन)पेज बनवणे : कलाकारांसाठी ही फेसबुकवरील "अत्यंत महत्वाची" गोष्ट आहे. "स्वत:चे (फॅन)पेज स्वत:च कसे बनवायचे", "माझे असे कितीसे फॅन्स असणार?" असे तात्विकदृष्ट्या अतिशय गहन आणि प्रॅक्टीकली तितकेच निरर्थक प्रश्न स्वत:ला कृपया अजिबात पाडून घेऊ नयेत! (फॅन)पेज कुणी तयार केले याची नोंद त्या पेजवर "By Default" नसते. त्यामुळे तुमचं अजूनही (फॅन)पेज नसल्यास हा ब्लॉग वाचवणं थांबवून आत्ताच एक पेज तयार करा!
२.रोज फॅनपेजवर एकतरी पोस्ट करा : फॅनपेजचे सदस्य वाढवण्याचा हा सोप्पा आणि विनाखर्चिक उपाय आहे! News Feed तयार होताना (फॅन)पेजने केलेल्या पोस्टसना फेसबुकवर सगळ्यात जास्त प्राधान्य असते आणि या पोस्ट्स द्वारे (फॅन)पेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकचे अल्गोरिदम डिझाईन्ड आहेत. अर्थात एखाद्या पोस्टची पोहोच ही त्या पेजच्या फॅन्सच्या ( साधारणत: ) प्रमाणात असते! तसच पोस्ट ही तुमच्या कलेबद्दलच असण आवश्यक नाही, जगातल्या कुठल्याही विषयाबद्दल आपले मत तुम्ही मांडू शकता. साधारणत: तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा पोस्टस केल्यास आणि तुम्ही लोकांपर्यंत पोस्टद्वारे पोहोचवलेली माहिती लोकांना आवडल्यास अनेक लोकं स्वत:हून तुमच्या पेजचे मेंबर होतात आणि ही संख्या Exponentially देखील वाढते. वानगीदाखल आम्ही मानबिंदूच्या फॅन पेजचा ग्राफ आम्ही इथे शेअर करत आहोत! याव्यतिरीक्त फ़ॅन्सची संख्या वाढविण्यसाठी तुम्ही फेसबुकमध्ये पेड जाहीरातही देऊ शकता!
३.आपल्या फॅन्सना वैयक्तीक उत्तर द्या : तुमच्या फॅन्सना तुमच्याशी संपर्कात रहायला आवडते. तुमच्या पेजचा वापर "ब्रॉडकास्ट" करण्यासाठी न वापरता संवाद साधण्यासाठी वापरा, फॅन्सशी जिव्हाळ्याचं नातं जोडण्याचा प्रयत्न करा!
४. आपल्या कलाकृतीचे फॅनपेज करण्यापेक्षा तुमचे वैयक्तीक फ़ॅनपेज सुरू करा: बरेचसे गायक/संगीतकार आपल्या अल्बमचे किंवा चित्रपटाशी संदर्भात व्यक्ती आपल्या चित्रपटाचे फॅनपेज प्रमोट करतात. असं करण्यापेक्षा अनुक्रमे आपले स्वत:चे किवा प्रॉडक्शन हाऊसचे पेज तयार करावे, जेणेकरून पुढच्या अल्बम/चित्रपटाच्या वेळी आधीच संलग्न असलेल्या फॅन्सशी तुम्ही आपोआप पोहोचता आणि तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागत नाही!
५. स्मॉल आणि कॅपिटल लेटर्सचा योग्य वापर करा: एखाद्या व्यक्तीचे नाव/आडनाव इंग्रजीत लिहिताना पहिले अक्षर आवर्जून कॅपिटल लेटर मध्ये लिहा, अन्यथा ते वाचताना खूपच बाळबोध वाटते.स्वत:चे नाव संपूर्णत: स्मॉल लेटर्समध्ये वाचायला ब-याच जणांना आवडत नाही. इंग्रजी संकेतात ते दुस-याला कमी लेखणे समजले जाते! तसच संपूर्णपणे कॅपिटल लेटर्स मध्ये कुठलीही पोस्ट करू नये, दुस-याच्या अंगावर ओरडण्यासाठी इंग्रजी भाषेत या संकेताचा वापर केला जातो!
६. चांगल्या गोष्टी लाईक आणि शेअर करा : लाईक आणि शेअर या दोनच गोष्टींवर फेसबुक प्रामुख्याने आधारीत आहे! एखादी गोष्ट जितकी जास्त लाईक आणि शेअर केली जाते,तितका फेसबुकच्या News Feeds मध्ये त्या पोस्टला प्राधान्यक्रम जास्त मिळतो आणि आपोआप तितक्या जास्त लोकांपर्यंत ती गोष्ट आपोआप पोहोचते.तुम्हाला इतरांच्या आवडलेल्या गोष्टी खुल्या मनाने लाईक आणि शेअर करा. जेणेकरून इतर लोकंही खुल्या मनाने तुमच्या चांगल्या गोष्टी/पोस्टस/कलाकृतीना शेअर करतील कारण तुम्ही जे समाजाला देता तेच तुम्हाला परत मिळतं!
सध्यासाठी इतकच! हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास खाली दिलेल्या लाईक बटनावर क्लिक करून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा!
तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा! :)
धन्यवाद!