"जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे!"
अप्रतिम, देखणा आणि भव्य असं बालगंधर्व या चित्रपटाचं तीन शब्दात वर्णन करता येईल. बालगंधर्वांनी साकारलेली संगीत नाटकं रात्रीपासून पहाटेपर्यंत चालत असत, त्यामुळे चित्रपट पाहिल्यावर असं जाणवतं की बालगंधर्वांसारख्या महान कलाकाराचं गंधर्वयुग साकारण्यासाठी अडीच-तीन तास ही अगदीच अपुरी वेळ आहे. केवळ त्यामुळेच चित्रपट पाहूनही कुठेतरी अतृप्त राहील्यासारखं वाटतं रहातं; अन्यथा नितीन देसाईंनी हा चित्रपट ज्या भव्यतेने साकारला आहे ते पहाताना अस वाटतं की हा चित्रपट अजून दिवसभर चालला असता तरी अगदी आनंदाने पाहिला असता :)
या चित्रपटातली फ्रेम अन फ्रेम अतिशय देखणी आहे. नितीन देसाईंची ही खासियत असून ती बालगंधर्व या चित्रपटाच्या निर्मीतीमध्ये पुन्हा प्रकर्षाने जाणवते! सुबोध भावेचा अभिनय तर दृष्ट लागण्यासारख्या झाला आहे. उंची भरजरी वस्त्र आणि दागदागिने घातलेला स्त्रीवेषातला सुबोध सुंदरच दिसतो. मध्यंतरापूर्वीचे तरुण बालगंधर्व आणि मध्यंतरानंतर वयस्कर झालेले बालगंधर्व दाखवण्यासाठी सुबोधने देहबोलीत केलेला बदल केवळ लाजवाब आहे! विभावरी देशपांडेनेही बालगंधर्वांच्या पत्नीचा अप्रतिम आणि लक्षात रहाण्यासारखा रोल केलाय! पूर्वी संगीत नाटकांची सुरुवात नांदीने व्हायची, म्हणून या चित्रपटाचीही सुरूवात देखील नांदीने होईल अशी एक अपेक्षा होती पण ती पूर्ण नाही झाली. नांदी या चित्रपटात शेवटी येते. पण या नांदीच्या सुरुवातीला वाजलेल्या अनेक तबल्याच्या एकत्र ठेक्याने अंगावर शहारा मात्र येऊन जातो! या नांदीच्या शेवटी असलेल्या "असा बालगंधर्व आता न होणे" या ओळी चित्रपटातल्या महत्वाच्या क्षणी पार्श्वसंगीतासाठी वापरल्या असत्या तर चित्रपट आणखी परिणामकारक झाला असता.
चित्रपटाचं संगीत हे अर्थातच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. बालगंधर्वांनी अजरामर केलेली अनेक गाणी या चित्रपटात झलक स्वरुपात घेतलेली आहेत, त्यामुळे संपूर्ण गाण्यांचा आस्वाद घेण्याचा आनंदापासून कुठेतरी वंचित राहिल्यासारखं वाटतं. वेळेचं बंधन नाईलाजाने पुन्हा आडवं आलय. खरतर गंधर्वांची गायकी आत्ताच्या काळात पडद्यावर उतरवणं हेच एक मोठं आव्हान होतं. कौशल इनामदारांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की," या चित्रपटासाठी बालगंधर्वांची गाणी पुन्हा रेकॉर्ड करायची होती. पण असं करायचं झाल्यास त्यांच्या आवाजाला आत्ताच्या काळात कुणाचा आवाज देणार हा खूप मोठा प्रश्न होता. बालगंधर्व हे एक चमत्कार होते आणि चमत्कारांची प्रतिकृती नाही करता येत! पण सुदैवाने आनंद भाटे(आनंद गंधर्व) यांच्या रुपात तो आवाज मला दिसला आणि सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले!". कौशल इनामदारांची निवड सार्थ ठरवत आनंद भाटेंनी बालगंधर्वांची सगळी गाणी चित्रपटात अप्रतिमच गायली आहेत. राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंची एका गाण्यात असलेली जुगलबंदी हाउसफुल्ल चित्रपटगृहातही दाद मिळवून जाते.
पण चित्रपट झाल्यानंतरही एक गाणं विशेष लक्षात रहातं ते म्हणजे कौशल इनामदारांनी या चित्रपटासाठी नव्याने संगीतबद्ध केलेलं आणि बेला शेंडेने गायलेलं "पावना" हे गीत! या गाण्यातल्या "आज" या शब्दाचा उच्चार बेलाने इतका लडीवाळ केलाय आणि एकूणच गाणं इतकं सुंदर गायलय की क्या बात है!
एकूणच हा चित्रपट चित्रपटगृहात पहाताना पडद्यावरची नजर एकही क्षण हलत नाही आणि एकदा पाहिला तरी पुन्हा पहावासा वाटतो हे निश्चित! चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली दाखवताना बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे दाखवली असल्याने चित्रपट संपल्यावरही अनेकांचे पाय चित्रपटगृहातून निघता निघत नाहीत! बालगंधर्वसारखे चित्रपट वारंवार येत नाही म्हणूनच गंधर्वयुग अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहायलाच हवा!