Sunday, January 22, 2012

शाळा - एक नॉस्टेल्जिया | Shala Marathi Movie Review


शाळा - एक नॉस्टेल्जिया!


शाळा - एक नॉस्टेल्जिया | Shala Marathi Movie Review-blog.Maanbindu.com

सध्या सगळीकडे चर्चा आहे सुजय डहाके दिग्दर्शीत "शाळा" या चित्रपटाची! मिलींद बोकील लिखित शाळा या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत असून या चित्रपटाच्या निमीत्ताने प्रत्येक प्रेक्षक "शाळा" पहाताना आपल्या शालेय जीवनात जगलेल्या आयुष्याचा नॉस्टेल्जिया पुन्हा अनुभवतो!!

चित्रपट पहाताना तीन गोष्टींचे विशेष कौतुक करावेसे वाटते, त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कलाकारांची निवड आणि त्यांचा 'सहजाभिनय'! सारेगमप लिटल चॅंप्समध्ये स्पर्धक असलेल्या केतकी माटेगावकर हिला 'शिरोडकर'च्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पहाताना तिच्या साध्या, सुंदर आणि आणि निरागस दिसण्याने क्षणभर सगळ्यांचाच काळजाचा ठोका चुकतो आणि आपापल्या शालेय जीवनातली 'शिरोडकर' नकळत सगळ्यांच्याच डोळ्यासमोरून तरळून जाते!तिने आणि विशेषत: अंशुमन जोशी याने मुकुंद जोशीची भूमिका साकारताना केलेला वावर हा इतका सहज आहे की त्यांच्या नेहमीच्या शालेय जीवनाचं हे एखाद्या छुप्या कॅमेराने केलेलं शुटींग आहे की काय असा भास होतो. संपूर्ण चित्रपटात या दोघांच बेअरिंग अतिशय उत्तम जमलय आणि त्या दोघांचा पडद्यावरचा वावर हवाहवासा वाटतो! सिनेमात बरेच प्रसंगी अंशुमन जोशीने काहीही न बोलता केलेला केवळ चेह-यावर आणलेले भाव त्याच्या मनातलं सारं काही सांगून जातात. फावड्या, सु-या आणि इतर सगळ्याच पात्रांची निवड आणि त्यांचेही अभिनय लाजवाबच!


चित्रपटामध्ये कौतुक करण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटाचे लोकेशन्स! १९७० च्या दशकातलं गाव, गावामधली शाळा, आजूबाजूचा परिसर, मंदीर, शेत, डोह सारं काही मूळ कांदबरीत असलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळणारं आहे. त्या काळातल्या लोकांचे वेष ,ते वापरत असलेली त्या काळची जुनी घड्याळं, इतकचं काय तर बाजारात खरेदी विक्री करताना २ आणि ५ रुपयाच्या नोटा वापरण्यापर्यंत केलेलं डीटेलींग खरोखर वाखाणण्याजोगं आहे! आणिबाणीचा काळ दाखवताना त्यावेळेचे पोलीसांचे वेष, त्यावेळच्या लोकांची वागण्याबोलण्याची पद्धत हे ही खासच!

चित्रपटातील कौतुक करण्याची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वरील सगळ्या गोष्टी हाताळताना सुजय डहाकेमध्ये असलेलं दिग्दर्शन कौशल्य! इतक्या प्रसिद्ध कादंबरीवर चित्रपट बनवणं हे काम मुळातच खूप जोखमीच आणि अवघड आहे! दोन ते अडीच तासात अख्खी कादंबरी लोकांसमोर मांडण्यासाठी खूप अभ्यासाची आवश्यकता आहे. त्यातल्या वातावरणाची, पात्रांची निवड आणि त्यांचा अभिनय आणि एकंदरीतच डीटेलिंग पहाताना सुजय हा चित्रपट ख-या अर्थाने 'जगलाय' हे सतत जाणवत रहातं. चित्रपट कुठेही रटाळ, संथ वाटत नाही आणि चित्रपटातला प्रत्येक संवाद ,फ़्रेम अन फ़्रेम प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते. मात्र चित्रपट संपवताना थोडीशी घाई झाल्यासारखं वाटतं. चित्रपटाची लांबी थोडी वाढवून शेवट अधिक परिणामकारक करता आला असता असं वाटतं! संपूर्ण चित्रपटात एवढी एकच गोष्ट खटकते, बाकी चित्रपट अगदी नॉस्टेल्जिक आणि 'संग्राह्य' असून पदार्पणातच इतका सुंदर चित्रपट करून सुजयने दिग्दर्शनात 'Distinction' मिळवलय हे नक्की!

'शाळा' या चित्रपटाच्या निमित्ताने अजून एका प्रकारच्या बदलाचे वारे मराठी चित्रपटसृष्टीत वाहू लागले तर ते शाळा या चित्रपटाचं सर्वात मोठं यश ठरेल आणि ते म्हणजे उत्तमोत्तम साहित्याचर आधारीत चित्रपट निघण्याचे! मराठी भाषेत गेल्या अनेक दशकात दर्जेदार साहित्य निर्माण झालयं! त्या साहित्यावर व्यावसायिकरित्या यशस्वी चित्रपट जर निर्माण होऊ लागले तर मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा ख-या अर्थाने समृद्ध होईल. नटरंग या चित्रपटाने व्यावसायिक यश संपादन करत यातलं पहिलं पाऊल टाकलं आहे, शाळा हे त्यातलं दुसरं पाऊल ठरावं यासाठी मानबिंदू परिवारातर्फे अनेक शुभेच्छा!


Monday, November 7, 2011

10 Facebook Marketing Tips Marathi Artists | मराठी कलाकारांसाठी फेसबुक मार्केटींग्च्या खास १० टीप्सनुकतीच भारतात इंटरनेट वापरणा-यांची संख्या १०० मिलियन (१० कोटी) वर पोहोचल्याची बातमी वाचनात आली आणि अर्थातच ही संख्या भविष्यात वाढतच जाणार आहे! सध्याच्या युगात इंटरनेट वापरणा-या जवळपास प्रत्येकाचे फेसबुकवर अकाउंट असतच; म्हणून कलाकारांना स्वत:ची कला लोकांपर्यंत पोहोचवण्याच फेसबुकसारखं दुसरं माध्यम नाही. पण हे माध्यम योग्यप्रकारे हाताळण्याचेही काही अलिखित नियम आहेत आणि ते पाळल्यासच फेसबुकचा जास्तीत जास्त फायदा कलाकारांना होईल. हेच नियम सगळ्या कलाकरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उहापोह!10 Facebook Marketing Tips for Marathi Artists | मराठी कलाकारांसाठी फेसबुक मार्केटींग्च्या खास १० टीप्स
"A wise man is not the one who knows what to say but rather the one who knows what NOT to say" या प्रसिद्ध उक्तीनुसार फ़ेसबुक कसं वापरावं यापेक्षा फेसबुक कसं वापरू नये हे आधी सांगणं आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं.

फ़ेसबुक कसं वापरू नये

१. स्पॅमिंग करू नये : आपली गाणी/व्हिडिय़ोज "हॅमर" केल्यास ती लोकांना आवडतील या समजापोटी बरेचदा कलाकार आपली गाणी/व्हिडीयोज यांची एकच लिकं साधारणत: दररोज आपल्या किंवा दुस-यांच्या वॉलवर किंवा सतत एका ग्रूपमध्ये पोस्ट करतात. प्रत्येक ग्रुपवर, वॉलवर एखाद दोनदा पोस्टस करण हे योग्य आहेच, पण रोज त्याच त्याच गोष्टी "हॅमर" करणं म्हणजे स्पॅमिंगच आहे! असं करणा-या कलाकारांचाच (त्या गाण्या/व्हिडीयोपेक्षा) लोकांना कालांतराने "विट" येऊ लागतो आणि त्या कलाकारानी केलेल्या नंतर केलेल्या कुठल्याही पोस्ट सगळे Ignore करू लागतात. तुम्हाला रोज सकाळी वर्तमानपत्रात त्याच बातम्या वाचायला मिळाल्यास कसं वाटेल याचा विचार करा. प्रमोट करा आणि स्पॅम नव्हे!

२. स्वत:च ग्रूप तयार करून सरसकट सगळ्यांना ऍड करणे : आपली कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा सर्वात सोप्पा मार्ग कलाकारांना वाटतो. पण असे ग्रूप तयार करताना ऍड केल्या जाणा-या व्यक्तीची पूर्वसंमती घेणं आवश्यक नसल्याने, बरेचदा व्यक्तीला इंटरेस्ट नसताना त्यात ऍड केलं जातं. त्यांनतर कलाकारांनी केलेल्या सततच्या पोस्ट्समुळे त्या व्यक्तीला सतत नोटीफिकेशन्सचे इमेल येतात आणि ती व्यक्ती वैतागून त्या कलाकाराबद्दल तिचे निगेटीव्ह मत तयार होते! हा एक अप्रत्यक्ष स्पॅमिंगचा प्रकार आहे! तसच News Feed तयार करताना फ़ेसबुकच्या अल्गोरिदममध्ये ग्रूप पोस्टसना कमी प्राधान्य आहे, म्हणूनच अशा ग्रूप्सची सदस्यसंख्या आपोआप फार वाढत नाही आणि तुम्ही त्याच लोकांपर्यंत तीच माहिती पोहोचवत रहाता!

३. फोटोत नसलेल्या व्यक्तींना टॅग करणे : आपल्याबद्दची महिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक सोपा उपाय बरेचजण वापरतात. या पर्यायाचा वापर एखादवेळेस फार महत्वाची बातमी पोहोचवण्यासाठी केल्यास ठीक आहे पण वारंवार या गोष्टी केल्यास लोकांना तुमचा वीट येऊ लागतो आणि तुमच्याबद्दल निगेटीव्ह मत तयार होते!

४. फेसबुकचा वापर "फक्त" स्वतच्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी करणे : फेसबुक हे माध्यम संवाद साधण्यासाठी केलं असून फक्त "ब्रॉडकास्टींग"साठी नाही हे लक्षात घ्या. कार्यक्रमाच्या माहितीबरोबरच इतर विषयांवर वरचेवर पोस्ट्स कराव्यात जेणेकरून तुमच्या प्रोफाईलला एक "पर्सनल टच" येईल!

आता पाहूया फ़ेसबुक कसे वापरावे

१. स्वत:चे (फॅन)पेज बनवणे : कलाकारांसाठी ही फेसबुकवरील "अत्यंत महत्वाची" गोष्ट आहे. "स्वत:चे (फॅन)पेज स्वत:च कसे बनवायचे", "माझे असे कितीसे फॅन्स असणार?" असे तात्विकदृष्ट्या अतिशय गहन आणि प्रॅक्टीकली तितकेच निरर्थक प्रश्न स्वत:ला कृपया अजिबात पाडून घेऊ नयेत! (फॅन)पेज कुणी तयार केले याची नोंद त्या पेजवर "By Default" नसते. त्यामुळे तुमचं अजूनही (फॅन)पेज नसल्यास हा ब्लॉग वाचवणं थांबवून आत्ताच एक पेज तयार करा!

२.रोज फॅनपेजवर एकतरी पोस्ट करा : फॅनपेजचे सदस्य वाढवण्याचा हा सोप्पा आणि विनाखर्चिक उपाय आहे! News Feed तयार होताना (फॅन)पेजने केलेल्या पोस्टसना फेसबुकवर सगळ्यात जास्त प्राधान्य असते आणि या पोस्ट्स द्वारे (फॅन)पेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकचे अल्गोरिदम डिझाईन्ड आहेत. अर्थात एखाद्या पोस्टची पोहोच ही त्या पेजच्या फॅन्सच्या ( साधारणत: ) प्रमाणात असते! तसच पोस्ट ही तुमच्या कलेबद्दलच असण आवश्यक नाही, जगातल्या कुठल्याही विषयाबद्दल आपले मत तुम्ही मांडू शकता. साधारणत: तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा पोस्टस केल्यास आणि तुम्ही लोकांपर्यंत पोस्टद्वारे पोहोचवलेली माहिती लोकांना आवडल्यास अनेक लोकं स्वत:हून तुमच्या पेजचे मेंबर होतात आणि ही संख्या Exponentially देखील वाढते. वानगीदाखल आम्ही मानबिंदूच्या फॅन पेजचा ग्राफ आम्ही इथे शेअर करत आहोत! याव्यतिरीक्त फ़ॅन्सची संख्या वाढविण्यसाठी तुम्ही फेसबुकमध्ये पेड जाहीरातही देऊ शकता!


३.आपल्या फॅन्सना वैयक्तीक उत्तर द्या : तुमच्या फॅन्सना तुमच्याशी संपर्कात रहायला आवडते. तुमच्या पेजचा वापर "ब्रॉडकास्ट" करण्यासाठी न वापरता संवाद साधण्यासाठी वापरा, फॅन्सशी जिव्हाळ्याचं नातं जोडण्याचा प्रयत्न करा!

४. आपल्या कलाकृतीचे फॅनपेज करण्यापेक्षा तुमचे वैयक्तीक फ़ॅनपेज सुरू करा: बरेचसे गायक/संगीतकार आपल्या अल्बमचे किंवा चित्रपटाशी संदर्भात व्यक्ती आपल्या चित्रपटाचे फॅनपेज प्रमोट करतात. असं करण्यापेक्षा अनुक्रमे आपले स्वत:चे किवा प्रॉडक्शन हाऊसचे पेज तयार करावे, जेणेकरून पुढच्या अल्बम/चित्रपटाच्या वेळी आधीच संलग्न असलेल्या फॅन्सशी तुम्ही आपोआप पोहोचता आणि तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागत नाही!

५. स्मॉल आणि कॅपिटल लेटर्सचा योग्य वापर करा: एखाद्या व्यक्तीचे नाव/आडनाव इंग्रजीत लिहिताना पहिले अक्षर आवर्जून कॅपिटल लेटर मध्ये लिहा, अन्यथा ते वाचताना खूपच बाळबोध वाटते.स्वत:चे नाव संपूर्णत: स्मॉल लेटर्समध्ये वाचायला ब-याच जणांना आवडत नाही. इंग्रजी संकेतात ते दुस-याला कमी लेखणे समजले जाते! तसच संपूर्णपणे कॅपिटल लेटर्स मध्ये कुठलीही पोस्ट करू नये, दुस-याच्या अंगावर ओरडण्यासाठी इंग्रजी भाषेत या संकेताचा वापर केला जातो!

६. चांगल्या गोष्टी लाईक आणि शेअर करा : लाईक आणि शेअर या दोनच गोष्टींवर फेसबुक प्रामुख्याने आधारीत आहे! एखादी गोष्ट जितकी जास्त लाईक आणि शेअर केली जाते,तितका फेसबुकच्या News Feeds मध्ये त्या पोस्टला प्राधान्यक्रम जास्त मिळतो आणि आपोआप तितक्या जास्त लोकांपर्यंत ती गोष्ट आपोआप पोहोचते.तुम्हाला इतरांच्या आवडलेल्या गोष्टी खुल्या मनाने लाईक आणि शेअर करा. जेणेकरून इतर लोकंही खुल्या मनाने तुमच्या चांगल्या गोष्टी/पोस्टस/कलाकृतीना शेअर करतील कारण तुम्ही जे समाजाला देता तेच तुम्हाला परत मिळतं!

सध्यासाठी इतकच! हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास खाली दिलेल्या लाईक बटनावर क्लिक करून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा!

तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा! :)

धन्यवाद!


Monday, July 18, 2011

Best Practices : Making & Marketing Marathi Music Albums | मराठी अल्बम्स निर्मीती आणि मार्केटींग

Best Practices : Making & Marketing Marathi Music Albums | मराठी अल्बम्स निर्मीती आणि मार्केटींग


आजकाल बरेच नवीन (आणि जुने) गायक, संगीतकार आपल्याला आवडणारं, करावसं वाटणारं संगीत रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वत:चा अल्बम काढण्याचा पर्याय चोखंदळतात. पण या क्षेत्रातल्या अर्थकारणाचं व्यवस्थित ज्ञान नसल्याने उत्तम संगीताची निर्मीती करूनही त्यांच्या वाटेला नैराश्य येतं! मानबिंदूतर्फे मराठी संगीताचं मार्केटींग करताना निर्मीती, मार्केटींग आणि वितरण या सगळ्या प्रक्रियेत ब-याचशा उणीवा जाणवल्या. त्या दूर करता आल्या, तर परिस्थीती बरीचशी सुधारू शकेल असं वाटलं! तेच मुद्दे येथे मांडले आहेत.

नवीन मराठी अल्बम्समध्ये सहसा ८-१० गाणी असतात. प्रत्येक गाण्याचा निर्मीती खर्च (गायकांचं/अरेंजरचं/संगीतकाराचं मानधन,स्टुडिओचं भाडं हे धरून) साधारणत: प्रत्येक गाण्यामागे २५,००० ते ३५,००० येतो. त्यामुळे २ ते ३ लाख इथेच खर्च होतात. "ढोबळमानाने" प्रत्येक अल्बममधली २,३ किंवा फार तर ४ गाणीचं छानं असतात (लोकांना आवडतात) आणि बाकीची तितकी चांगली होत नाहीत.चाल बांधताना संगीतकाराला स्वत:लाही एक गाणं दुस-यापेक्षा उजवं झाल्याचं जाणवत असतच! बरं यातही जवळपास संपूर्णपणे किबोर्ड प्रोग्रॅमिंग वापरल्याने ती गाणी कानाला तितकासा आनंद देत नाहीत(कृत्रिम वाटतात). माझ्यामते ८ ते १० गाण्यांचा अल्बम करण्याऐवजी सर्वोत्तम शब्द,चाली असलेल्या ५-६ गाण्यांचाच अल्बम करावा. राहिलेले ३-४ गाण्यांपैकी काही बजेट अकाऊस्टीक, लाईव्ह संगीतासाठी, मार्केटींगसाठी वापरावं! जेणेकरून Quantity काम होण्यापेक्षा Quality काम होईल आणि ते जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.

गाण्यांचा शब्दांवर मेहनत घ्यावी, कारण लोकं जेंव्हा गाणं गुणगुणतात तेंव्हा शब्दच त्यांच्या ओठावर असतात (आणि संगीत डोक्यात वाजत असतं.). शब्द जितके, प्रभावी तितकं गाणं लोकप्रिय होण्याची शक्यता जास्त! मन उधाण वा-याचे हे उत्तम उदाहरण आहे!

गाणी अनेक गायकांकडून गाऊन घेण्यापेक्षा, एका किंवा दोन चांगल्या पण व्हर्सटाईल गायकांकडून बरीचशी गाऊन घ्यावीत. जेणेकरून गायक/गायिकेला आपली व्हर्सटॅलिटी दाखवण्याची मुभा मिळते आणि बल्क कॉंट्रॅक्ट दिल्याने गायक प्रत्येक गाण्यामागे कमी मानधन घेण्याची शक्यता वाढते.

अल्बम तयार झाल्यावर त्याचं लॉंच फ़ंक्शन होतं! नाही म्हणता म्हणता हा ही खर्च ३० ते ४० हजाराच्या घरात जातो (काही निर्मात्यांनी ७० ते ८० हजार अप्रतिम लॉंच फंक्शनसाठी खर्च केल्याचे ऐकिवात आहे!). बर हा खर्च करून आपण प्रेक्षागृहात उपस्थित असलेल्या ३००-४०० लोकांपर्यंतच पोहोचतो. या ऐवजी हेच पैसे PR किंवा वर्तमानपत्रातल्या जाहीरातीसाठी खर्च केले तर निदान ५-६ दिवस काही लाख लोकांपर्यंत पोहोचवणारी जाहीरात करता येते!

आता गाण्यांच्या CDs बाबत बोलू. मानबिंदूतर्फे आम्हाला CD डिस्ट्रीब्युशन सुरू करायचे होते. यासाठी एकंदरीत या व्यवसायाची सध्या काय स्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही (अगदी खासगीतल्या आणि वैयक्तीक ओळखीने) प्रिझम व्हिडीयोच्या संचालकांशी बोलणी केली होती. त्यांच्याच शब्दात सांगायच झालं तर ते म्हणाले, "या धद्याची परिस्थीती अतिशय वाईट आहे! एकेकाळी आम्ही गाडीच्या डिकीत भरून पैसे घरी नेले, पण आज ती स्थिती कंप्लीट बदलली आहे! आजकाल CDs कुणीही दुकानात जाऊन विकत घेत नाही. कॅसेट्स जशा कालबाह्य झाल्या त्याच मार्गावर CDs आहेत. लोकं मोबाईलमध्ये टाकून गाणी ऐकतात किंवा USB वर १००० गाणी टाकून ती कारमध्ये ऐकतात. याव्यतिरीक्त FM आणि TV, इंटरनेटद्वारे त्यांना बरीच गाणी ऐकायला मिळतात. त्यांची ती भूक भागते रे! कोण कशाला दुकानात जाऊन विकत घेईल तुझी नवीन CD? इतरांच जाऊ दे, तू दुकानात जाऊन शेवटीची CD कधी घेतली होतीस आठवतं का?.. घेतली असशील तर ती पण लता, आशाचीच असेल! स्वत:वरून जग ओळखावं रे... आणि सपोज तुला जर CD मुंबईतून नाशिकला किंवा इतर ठिकाणी पाठवायचीच असेल तर ती तुला वैयक्तीकरित्या तरी जाऊन द्यावी लागेल किंवा कुरीयरने पाठवावी लागेल तिकडच्या लोकल डिस्ट्रीब्युटरला, हा खर्च आहेच. तो तिथल्या लोकल दुकानात सप्लाय करणार! त्या दोघांच कमीशन त्यात आहे. पुन्हा तुला जकातकर आणि व्हॅट भरावा लागेल, त्याच्या पावत्या आणि वर्षाच्या शेवटी टॅक्स कॅल्क्युलेशन्स.. (हे सगळ ऑफिशियली करायचं असेल तर! नाहीतर इतर ठिकाणी पर्सनली जाऊन पैसे दाबावे लागतात.) एवढे करून तुझी CD फक्त तिथे पोहोचते. ती विकली जाईल न जाईल सांगता येत नाही. विकल्या गेलेल्या CDचे पैसे कित्येक डिलर्स थकवून ठेवतात.अर्धे देतात आणि अर्धे नंतर देतात सांगून देत नाहीत. न विकल्या गेलेल्या CDs दुकानदार दुकानात जागा नाही म्हणून परत पाठवतात, परत तो कुरीयरचा आणि पुन्हा जकातीचा खर्च तुझ्याच माथी! हे झालं एका डिलरच, महाराष्ट्रातल्या ५० डिलरशी ५० अल्बम्ससाठी डिल करताना तुझी मानसिक आणि आर्थिक अवस्था काय होईल याचा विचार कर! अरे आत्ता कुठला तो आता पिक्चर आला होता.. ’गजर’ की काय... त्याच्या २००० CD गोडाऊन मध्ये पडून आहेत.. सालं कुत्र पण विचारत नाही... ठेवायच्या कुठे आणि करायचं काय हा प्रश्न आहे.. ते बनवण्यामध्ये टाकलेला पैसा सुद्धा वायाच ना? आणि एवढं करून १०० मधला एखादा अल्बम चालतो रे, पण उरलेल्या ९९ चं काय? त्यात पुन्हा तुला काय मिळणार आणि प्रोड्युसरला काय मिळणार? शहाणा असशील तर यात पडू नकोस. मी माझ्या भाच्याची CD नाही रिलीज केली! तू जे मानबिंदूवरून ऑनलाईन CD सेल करतोयस तेच अगदी योग्य आहे. ऑर्डर आली तर CD कुरीयर करून टाकायची, पैसे ऑलरेडी मिळलेले असतात! त्याचं मार्केटींग कर आणि पसारा वाढव, तेच फ़्युचर आहे! ..आणि त्याहीपेक्षा पेड डाऊनलोड ठेवतोयस ते तर सर्वात उत्तम आहे. CD बनवण्याचा खर्च नाही, कुरीयरचा खर्च नाही आणि कुणाच कमीशान आणि Vat पण नाही, बरं लोकांनाही मोबाईलमध्ये टाकायला लगेच गाणी मिळतात म्हणून ते ही खूश! माझ्यामते तेच जास्त चालत असेल.. काय? "

त्यांचं म्हणण योग्यच होतं! मानबिंदूवर होणा-या सेल पैकी ८५% सेल हा डाऊनलोडचा आहे!

तुम्ही कुठल्याही म्युझिक कंपनीकडे गेलात तर तुमच्याच अल्बमच्या १००० CDs त्या तुम्हालाच विकत घ्यायला सांगतात साधारणत: ४० रु दराने. म्हणजे वर ४०,००० हजाराचा नाहक खर्च, पुन्हा त्या विकायच्या पण तुम्हीच! हा अगदी वायफळ खर्च आहे, जो तुम्ही मुळीच करू नये! आमच्या मते फार फार तर १०० ते २०० CDs करून घ्याव्यात. गरज पडल्यास आणखी CDs नंतर तुम्ही घेऊ शकता.

वरील सर्व मार्ग अवलंबल्यास १ ते १.५ लाखापर्यंत निर्मीती खर्च तुमचा अल्बममागे सहज वाचू शकतो! हा खर्च तुम्ही अल्बमचा व्हिडीओ बनवण्यासाठी किंवा त्याच्या पब्लिसीटीसाठी करावा. मानबिंदूतर्फे ऑनलाईन सेलिंग आणि एकंदरीत मार्केटींगसाठी आम्ही खालील पर्याय सुचवतो!

१. मानबिंदूतर्फे आम्ही मराठी संगीताची ऑनलाईन विक्री करतो आणि या विक्रीचा ८०% भाग निर्मात्यांना मिळतो. यामध्ये तुमच्या अल्बमची संपूर्ण माहिती देणारी एक मायक्रोसाईट बनवून दिली जाते आणि ऑनलाईन सेलिंगसाठी १८ बॅंकांचे क्रेडीट कार्डस, २० बॅंकाचं नेटबॅंकिंग, क्रेडीट कार्ड्स आणि मोबाईल बॅंकिंग असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जातात. उदा. गंध हलके हलके, स्पंदन हे अल्बम्स.

२. मराठी संगीताच्या फेसबुकवरील प्रसारासाठी आणि तिथून ऑनलाईन विक्रीसाठी मानबिंदू मराठी संगीत ऍप्लीकेशन बनवले आहे. हे मानबिंदूच्या फॅनपेजव्यतिरीक्त अन्य ७२ फॅनपेजवर उपलब्ध आहे! उदा. स्वप्नील बांदोडकर फॅन्स , अभिजीत राणे फॅन क्लब. (तुम्हालाही तुमच्या फॅनपेजवर हे ऍप्लीकेशन क्षणार्धात सुरू करता येईल! यासाठी ऍप्लीकेशन पेजवर जाऊन डाव्या बाजूस असलेल्या Add to My Page वर क्लिक करावे.)

३. मराठी संगीत अन्य वेबसाईट्स आणि ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मानबिंदू म्युझिक शॉपी हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे आजमितीस मराठी संगीत १२२ मराठी ब्लॉग्स/वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे! ( तुम्हालाही तुमच्या ब्लॉगद्वारे/वेबसाईटद्वारे मानबिंदू म्युझिक शॉपीच्या सहाय्याने काही क्षणातच मराठी संगीताचा प्रसार करता येईल आणि सोबत उत्पन्न मिळवता येईल)

४. तुमच्या अल्बममधल्या एका गाण्याचा व्हिडीयो १५ ते २०,००० या अत्यंत कमी किमतीत बनवून देण्याची सोय मानबिंदूतर्फे आम्ही उपलब्ध करून देत आहोत! युट्य़ुब आणि फेसबुकवरील प्रभावी प्रसारासाठी व्हिडियो हे खूप प्रभावी माध्यम आहे! चांगल्या गाण्याचा, चांगला व्हीडीओ लोक स्वत:हून इतरांबरोवर शेअर करतात! यूट्यूबवर तो कायस्वरुपी असल्याने, आपोआप तुमचं गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं जातं! यूट्यूब वरील प्रमोटेड व्हिडियोज ही Paid सेवा वापरून तुम्ही तुमचा व्हिडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता!

५. गूगल ऍडवर्डस ई सेवा वापरून जगभरातल्या गूगल द्वारे इटरनेटवर प्रभावीपणे मार्केटींग करता येते! याद्वारे तुमच्या अल्बमची जाहीरात गुगल सर्च रिझल्ट्समध्ये, जीमेल मध्ये आणि जवळपास जगातल्या ८०% वेबसाईटसवर दाखवता येते. जगातल्या कुठल्या भागात जाहीरात दाखवायची ही सोय तुमच्याकडे असते. जेणेकरून परदेशात किंवा भारतातल्या दिल्ली, बॅंग्लोर मैसूर अशा कुठल्याही भागातल्या मराठी रसिकांपर्यंत सहज पोहोचता येते!

६. फेसबुकवरही या प्रकारची जाहीरात करून, विशिष्ट फॅनपेजेसशी संलग्न असलेल्या, विशिष्ट वयोगटातल्या, विशिष्ट भागातल्या लोकांपर्यत आपण पोहोचू शकतो!

७. मानबिंदूने INS Accredited ऍड एजन्सीशी टाय अप केल्याने, कुठल्याही वर्तमानपत्रात अगदी कमी किमतीत जाहीरात छापली जाऊ शकते!

८. लवकरच मानबिंदूतर्फे कॉलरट्यून्सची सेवा आम्ही उपल्बध करून देत आहोत!

९. आपल्या अल्बमला फक्त लेबल मिळावे यासाठी जर तुम्ही कुठल्याही कंपनीकडे जात असाल, तर तुम्ही मानबिंदूच्या लेबलखालीही आपला अल्बम प्रकाशित करता येईल.

एकंदरीत पहाता मराठी अल्बम्सचं योग्य मार्केटींग करण्याचे अणि ऑनलाईन विक्रीतून उत्पन्न मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, पण त्यासाठी बजेट असणं आवश्यक आहे आणि बजेटसाठी प्लॅनिंग असण अत्यावश्यक आहे! अगदी पहिल्या पायरीपासून! ते योग्य केल्यास पुढच्या ब-याच गोष्टी सहज शक्य होतात!

जाता जाता एक सांगायचय, लतादीदी आणि आशाताई अद्वितीय गायिका तर होत्याच, पण त्यावेळेस उपलब्ध असलेली सर्वोत्तम टेक्नॉलॉजी - रेडीओ चा वापर करून त्यांनी आपला आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला म्हणूनच त्या यशस्वी आहेत आणि आज त्यांच्या कारकिर्दीकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं. अगदी ताजं उदाहराण द्यायचं तर अमेरिकेतला सर्वात तरूण पॉपस्टार, १३ वर्षीय जस्टीन बाबर हा याने घरी बनवून व्हिडियोस सुरूवातीला युट्य़ूब वर टाकले आणि आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली! आता त्याच्या व्यावसायिक पद्धतीने लॉंच केलेल्या या व्हिडिओचे एका वर्षात ५८ कोटीहून जास्त व्हूज आहेत!!! या दोन उदाहरणांवरून सगळ्यांनाच बरच काही शिकण्यासारखं आहे!

तुमच्या पुढील उपक्रमांसाठी तुम्हाला मानबिंदूतर्फे अनेक शुभेच्छा!

(अधिक महितीसाठी आमच्याशी इथे संपर्क साधावा)


Wednesday, May 11, 2011

Balgandharva Marathi fim: A must watch | Balgandharva Review । बालगंधर्व परीक्षण

Balgandharva Marathi fim: A must watch | Balgandharva Review । बालगंधर्व परीक्षण


"जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे!"

अप्रतिम, देखणा आणि भव्य असं बालगंधर्व या चित्रपटाचं तीन शब्दात वर्णन करता येईल. बालगंधर्वांनी साकारलेली संगीत नाटकं रात्रीपासून पहाटेपर्यंत चालत असत, त्यामुळे चित्रपट पाहिल्यावर असं जाणवतं की बालगंधर्वांसारख्या महान कलाकाराचं गंधर्वयुग साकारण्यासाठी अडीच-तीन तास ही अगदीच अपुरी वेळ आहे. केवळ त्यामुळेच चित्रपट पाहूनही कुठेतरी अतृप्त राहील्यासारखं वाटतं रहातं; अन्यथा नितीन देसाईंनी हा चित्रपट ज्या भव्यतेने साकारला आहे ते पहाताना अस वाटतं की हा चित्रपट अजून दिवसभर चालला असता तरी अगदी आनंदाने पाहिला असता :)

या चित्रपटातली फ्रेम अन फ्रेम अतिशय देखणी आहे. नितीन देसाईंची ही खासियत असून ती बालगंधर्व या चित्रपटाच्या निर्मीतीमध्ये पुन्हा प्रकर्षाने जाणवते! सुबोध भावेचा अभिनय तर दृष्ट लागण्यासारख्या झाला आहे. उंची भरजरी वस्त्र आणि दागदागिने घातलेला स्त्रीवेषातला सुबोध सुंदरच दिसतो. मध्यंतरापूर्वीचे तरुण बालगंधर्व आणि मध्यंतरानंतर वयस्कर झालेले बालगंधर्व दाखवण्यासाठी सुबोधने देहबोलीत केलेला बदल केवळ लाजवाब आहे! विभावरी देशपांडेनेही बालगंधर्वांच्या पत्नीचा अप्रतिम आणि लक्षात रहाण्यासारखा रोल केलाय! पूर्वी संगीत नाटकांची सुरुवात नांदीने व्हायची, म्हणून या चित्रपटाचीही सुरूवात देखील नांदीने होईल अशी एक अपेक्षा होती पण ती पूर्ण नाही झाली. नांदी या चित्रपटात शेवटी येते. पण या नांदीच्या सुरुवातीला वाजलेल्या अनेक तबल्याच्या एकत्र ठेक्याने अंगावर शहारा मात्र येऊन जातो! या नांदीच्या शेवटी असलेल्या "असा बालगंधर्व आता न होणे" या ओळी चित्रपटातल्या महत्वाच्या क्षणी पार्श्वसंगीतासाठी वापरल्या असत्या तर चित्रपट आणखी परिणामकारक झाला असता.चित्रपटाचं संगीत हे अर्थातच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. बालगंधर्वांनी अजरामर केलेली अनेक गाणी या चित्रपटात झलक स्वरुपात घेतलेली आहेत, त्यामुळे संपूर्ण गाण्यांचा आस्वाद घेण्याचा आनंदापासून कुठेतरी वंचित राहिल्यासारखं वाटतं. वेळेचं बंधन नाईलाजाने पुन्हा आडवं आलय. खरतर गंधर्वांची गायकी आत्ताच्या काळात पडद्यावर उतरवणं हेच एक मोठं आव्हान होतं. कौशल इनामदारांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की," या चित्रपटासाठी बालगंधर्वांची गाणी पुन्हा रेकॉर्ड करायची होती. पण असं करायचं झाल्यास त्यांच्या आवाजाला आत्ताच्या काळात कुणाचा आवाज देणार हा खूप मोठा प्रश्न होता. बालगंधर्व हे एक चमत्कार होते आणि चमत्कारांची प्रतिकृती नाही करता येत! पण सुदैवाने आनंद भाटे(आनंद गंधर्व) यांच्या रुपात तो आवाज मला दिसला आणि सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले!". कौशल इनामदारांची निवड सार्थ ठरवत आनंद भाटेंनी बालगंधर्वांची सगळी गाणी चित्रपटात अप्रतिमच गायली आहेत. राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंची एका गाण्यात असलेली जुगलबंदी हाउसफुल्ल चित्रपटगृहातही दाद मिळवून जाते.
पण चित्रपट झाल्यानंतरही एक गाणं विशेष लक्षात रहातं ते म्हणजे कौशल इनामदारांनी या चित्रपटासाठी नव्याने संगीतबद्ध केलेलं आणि बेला शेंडेने गायलेलं "पावना" हे गीत! या गाण्यातल्या "आज" या शब्दाचा उच्चार बेलाने इतका लडीवाळ केलाय आणि एकूणच गाणं इतकं सुंदर गायलय की क्या बात है!

एकूणच हा चित्रपट चित्रपटगृहात पहाताना पडद्यावरची नजर एकही क्षण हलत नाही आणि एकदा पाहिला तरी पुन्हा पहावासा वाटतो हे निश्चित! चित्रपटाच्या शेवटी श्रेय नामावली दाखवताना बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे दाखवली असल्याने चित्रपट संपल्यावरही अनेकांचे पाय चित्रपटगृहातून निघता निघत नाहीत! बालगंधर्वसारखे चित्रपट वारंवार येत नाही म्हणूनच गंधर्वयुग अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहायलाच हवा!


Friday, March 4, 2011

मराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही!

नवीन मराठी संगीताच्या इंटरनेटवरील प्रभावी प्रसारासाठी सध्या "मानबिंदू म्युझिक शॉपी" हा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. माहितीजालावर असलेल्या प्रत्येक मराठी ब्लॉग/संकेतस्थळावर नवीन मराठी संगीत सहज उपलब्ध व्हावे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे; तसच संगीताच्या ऑनलाईन् विक्रीतून संकेतस्थळ/ब्लॉग चालविणा-या व्यक्तीला उत्पन्नही मिळावे हे या प्रकल्पाचे मूळ उद्दीष्ट आहे. "मानबिंदू म्युझिक शॉपी" तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर सुरू करण्यासाठी "कुठल्याही" तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसून फक्त आम्ही दिलेल्या ४-५ ओळी तुमच्या संकेतस्थळावर कॉपी पेस्ट करणे अभिप्रेत आहे! ब्लॉगसाठी तर हे काम फक्त ३ क्लिक्स मध्ये फत्ते होते!

याबद्दल सविस्तर माहिती http://shopee.maanbindu.com येथे दिलेलीच आहे. तरीही या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन आणि आपणही ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवून हा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यास आम्हाला मदत करावी असे आम्ही आवाहन करतो!

Monday, January 17, 2011

संकल्पना । Journey of Maanbindu Marathi Website


'पोटापाण्याचा उद्योग तर हवाच. पण नाटक,गाणं ,कविता, अशा एखाद्या कलेशी नातं ठेवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील आणि कलेशी असलेलं नातं जगायाचं कशासाठी ते सांगेल! ' हे पुलंनी उद्गारलेले मोलाचे शब्द आम्हाला पटले आणि त्यातून जन्म झाला मानबिंदू.कॉम या पोर्टल चा!

सध्या हे पोर्टल गुणी मराठी कलाकार, नवीन मराठी संगीत, नवीन मराठी चित्रपट, नवीन मराठी नाटक यांचा इंटरनेटवर अधिकाधिक प्रसार करण्यासाठी काम करतय! या मध्ये स्वप्नील बांदोडकर, पुष्कर लेले, अभिजीत राणे या सारखे तरुण कलाकार; स्पंदन, गंध हलके हलके, संगीत मनमोही रे, गर्द निळा गगनझुला, तुझा चेहरा आघात, कस या सारखे मराठी चित्रपट, अजय-अतुल यांचे लाईव्ह शोज,संन्यस्त ज्वालामुखी सारखं विवेकानंदांच विचार पसरवणारं नाटक अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे!

मानबिंदू.कॉम हे तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मराठीतलं सर्वात अग्रेसर पोर्टल आहे. यातील काही महत्वाचे टप्पे या प्रमाणे :
  • इंटरनेट बॅंकींगसारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असलेलं पहिलं मराठी पोर्टल!
  • याहू, गूगल सारखा स्वत:चा टुलबार असणारं पहिलं मराठी पोर्टल!
  • नवीन मराठी चित्रपट, नवीन मराठी संगीत यासाठी स्वत:चं फेसबुक ऍप्लीकेशन बनवणारं पहिलं मराठी पोर्टल
  • कलाकारांच्या कार्यक्रमांचे, मराठी नाटकांसाठीचे Free Sms Alerts पुरवणारं पहिलं मराठी पोर्टल
  • देशातील सर्वाधिक पाहिल्या जाणा-या व्हिडियो चॅनेल्समध्ये मानबिंदूचा YouTube Video Channel २६व्या क्रमांकावर
  • फेसबुक फॅनक्लब ची  सदस्यसंख्या ५२०० हून अधिक!
  • ऑकुट कम्युनिटीची सदस्यसंख्या जवळपास ७०००!
.. आणि हे सगळ शक्य झालय तुमच्या प्रेमामुळे! असाच लोभ असावा किंबहूना तो वृद्धींगत व्हावा ही सदीच्छा!